पाकिस्तानसाठी हेरगिरी, उत्तर प्रदेशच्या दोघांना कर्नाटकमध्ये अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशातील दोन शिपयार्ड कर्मचाऱ्यांना कर्नाटकातील उडुपी येथून अटक करण्यात आली आहे. 18 महिन्यांचा गोपनीय डाटा व्हॉट्यसअॅपद्वारे शेअर करण्यात आला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणांना हेरगिरी नेटवर्कचा संशय आहे. व्हॉट्सअॅपद्वारे पाठवल्या जाणाऱ्या संवेदनशील डेटाची पुष्टी झाल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशातील रोहित आणि संत्री अशी आरोपींची नावे असून ते सुषमा मरीन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून मालपे कोचीन शिपयार्डमध्ये कंत्राटावर काम करत होते. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता किनारपट्टी भागात सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी 18 महिन्यांहून अधिक काळ गोपनीय शिपयार्ड माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. त्यात गोपनीय जहाजबांधणी माहिती, जहाजांचे क्रमांक आणि इतर संवेदनशील डेटा व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानमधील म्होरक्यांना पाठवत होते. पोलिस आणि तपास संस्थांनी केलेल्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, संवेदनशील माहिती परदेशी क्रमांकांवर पाठवण्यात आली होती. ज्यामुळे देशाच्या सागरी सुरक्षा, पायाभूत सुविधांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शिपयार्डमधून लीक झालेली माहिती संरक्षण जहाजे, मालवाहू जहाजे आणि इतर तांत्रिक तपशीलांशी संबंधित असू शकते ज्याचा शत्रू देशांकडून गैरवापर केला जाऊ शकतो.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान दोघांच्या मोबाईलमधील अनेक चॅट, मीडिया फाईल आणि कागदपत्रे सापडली आहेत. ज्याचा फॉरेन्सिक तपास केला जात आहे, आता हे दोघं कधीपासून ही हेरगिरी करत आहेत त्याचा तपास करत आहेत आणि त्यांच्या पाठीमागे कोणती संघटना आहे का? याचा तपास सुरू आहे. पोलीसांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षा संस्था देखील या प्रकरणात सहभागी झाल्या आहेत आणि पुढील तपास सुरू आहे.