
हिंदुस्थानच्या ज्युनिअर महिला हॉकी टिमच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे, आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेत तपास करण्याचे आदेश दिले आहेत. हिंदुस्थानच्या ज्युनियर महिला हॉकी टिमला ‘एफआयएच हॉकी ज्युनिअर वर्ल्ड कप 2025’ मध्ये सहभागी होण्यासाठी चिलीतील सॅंटियागो येथे जाणार आहे. ही टुर्नामेण्ट 1 डिसेंबरपासून सुरु होणार असून याआधीच क्रीडा मंत्रालयाने कारवाईची पावले उचलली आहेत.
हिंदुस्थानच्या ज्युनियर महिला हॉकी टीमने मागच्या काही दिवसांमध्ये परदेश दौऱ्यांपैकी एक दोन दौऱ्यात गैरवर्तन झाले होते. ही टूर जूनमध्ये अर्जेंटीना, बेल्जियम नेदरलैंड्स आणि सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होती. यामध्ये महिला टीममधील एक खेळाडू सातत्याने प्रशिक्षकाच्या खोलीत जाताना दिसत होती. आता या प्रकरणावर क्रीडा मंत्रालयाशी जोडलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आधी चौकशी अहवालाची वाट पाहू आणि नंतर दोषी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. शिवाय आमचा विभाग अशा बाबी खूप गांभीर्याने घेतो आणि जर कोणी दोषी आढळले तर आम्ही कठोर कारवाई करू.तर क्रीडा मंत्रालय, हिंदुस्थानचे क्रीडा प्राधिकरण किंवा हिंदुस्थानातील फील्ड हॉकीसाठी प्रशासकीय संस्था हॉकी इंडियाकडे अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही.
याप्रकरणी क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे, कायद्यानुसार, प्रशिक्षक, तक्रारदार आणि संबंधित खेळाडूची नावे उघड करता येत नाहीत. लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रारदार, आरोपी आणि साक्षीदारांची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकरणाबद्दल मी पहिल्यांदाच ऐकले आहे. हॉकी इंडियाच्या लक्षात न आणलेल्या कोणत्याही गोष्टीवर मी भाष्य करू शकत नाही. आम्ही मंत्रालयाच्या अहवालाची वाट पाहत आहोत, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या संवेदनशील विषयावर अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही असे हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंग म्हणाले.





























































