
सततच्या वातावरणातील बदलामुळे भातशेती धोक्यात आली आहे. तेच आंबा काजू फळ पिकांचेही झाले आहे त्यामुळे शेती करणे सोडून मंडणगड तालुक्यातील अनेकांनी रोजगारासाठी पुणे , मुंबई , ठाणे आदी विविध ठिकाणच्या शहरांची वाट धरली आहे. त्यामुळे गावेच्या गावे ओस पडू लागली आहेत. अशातच मुळ दापोली तालुक्यातील मांदिवली या गावचे रहिवासी असलेले आणि सध्या मंडणगड तालूक्यात रहिवास असलेल्या पर्यावरणप्रेमी भावेश कारेकर यांनी आयटी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून वडवली या महसुली गावाच्या हद्दीत तब्बल 50 एकर जमीनीच्या क्षेत्रावर 20 हजार बांबू ची लागवड करुन आपल्या उत्पन्नाचा नवा मार्ग शोधला आहे. कारेकर यांनी केलेल्या बांबू लागवडीच्या यशस्वी प्रयोगामुळे त्यांचे पुढील साधारणपणे तीस ते पस्तीस वर्षे ठोस शाश्वत उत्पन्नाचे साधन तयार झाले आहे.
भावेश कारेकर यांनी आयटी क्षेत्रातील उत्तम पगाराची नोकरी सोडून पर्यावरण वाचविण्यासाठी सर्वप्रथम स्वतः बांबू लागवडीचा प्रयोग केला. त्यांनी मंडणगड तालुक्यातील वडवली महसुली गावात 50 एकर जमिनीवर तब्बल 20 हजार बांबू लागवड केली आहे. सन 2022/23 मध्ये केलेली बांबू लागवड चांगलीच वाढली आहे. त्यामुळे त्यांचा बांबू लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. यात त्यांनी वडवली तसेच पंचक्रोशीतील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शेतातून मिळणारा आर्थिक फायदा कमी होत असताना बांबू लागवड हा शाश्वत नफ्याचा उत्तम पर्याय आहे.कमी खर्च दिर्घकालीन उत्पादन आणि विविध औद्योगिक उपयोगांमुळे बाबू शेती शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
कोकणातील नवीन पिढीने शेतीकडे पाठ फिरवली आहे, असे चित्र दिसत आहे.अशा पार्श्वभूमीवर मंडणगड व दापोली तालुक्यातील तरुण भावेश कारेकर यांनी मित्रमंडळींच्या साहाय्याने तब्बल 50 एकरांवर बांबू शेती उभी करून वेगळाच आदर्श घालून दिला आहे. आयटी क्षेत्रातील उच्च पदावरील नोकरी सोडून त्यांनी आपल्या तालुक्यात शेती, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धनावर काम करण्याचा ध्यास घेतला आहे.





























































