
प्रॉपर्टी डीलर फ्रेडी डिमेलोवर गोळीबारप्रकरणी पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मुन्ना मयुदीन शेख ऊर्फ गुड्डू राजेश चौहान, सुभाष मोहिते, मंगेश चौधरी, कृष्णा ऊर्फ रोशन सिंग अशी त्याची नावे आहेत. राजेश हा मुख्य सूत्रधार आहे. त्याचा फ्रेडीसोबत पैशावरून वाद होता. त्याने फ्रेडीला रेकी करून हत्या करण्यासाठी शूटरला पैसे दिल्याचे तपासात समोर आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रेडी आणि राजेश हे एकमेकांच्या संपका&त होते. त्यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून पैसे आणि मालमत्तेवरून वाद सुरू होता. फ्रेडीला कायमचा धडा शिकवण्यासाठी राजेशने कट रचला. त्याने फ्रेडीची हत्या करण्यासाठी शूटरला सुपारी दिली. शूटरने फ्रेडीची रेकी केली. रेकी केल्यानंतर फ्रेडीवर गोळीबार करण्याचे ठरले. बुधवारी फ्रेडी चारकोप येथे आला तेव्हा मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी फ्रेडीवर गोळीबार करून पळ काढला. गोळीबारात जखमी झालेला फ्रेडी रुग्णालयात गेला तेव्हा गोळीबाराचा प्रकार समोर आला.
चारकोप पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते. तपासासाठी 12 पथके तयार केली. तपासादरम्यान पोलिसांनी गुड्डूला कांदिवली येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्या चौघांची नावे समोर आली. त्या चौघांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक पुणे जिह्यातील भोर येथे गेले. तेव्हा आरोपी हे एका घराबाहेर बसले होते. पोलिसांना पाहताच ते जंगलात पळून गेले. पोलिसांनी दोन किलोमीटर पाठलाग करून त्या चौघांना पकडले. त्यांच्याकडून एक पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे. त्या चौघांना पुढील कारवाईसाठी चारकोप पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.





























































