
>> प्रकाश कांबळे
शिक्षणाची दारे खेड्यापाड्यांत, गावपातळीवरील घराघरांत पोहोचावीत, यासाठी राज्य सरकार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत असतानाही सांगली जिल्ह्यात आजही अनेक शाळा एका शिक्षकावर अवलंबून असल्याचे चित्र समोर आले आहे. सन 2024-25च्या आकडेवारीनुसार 316 शाळा एकशिक्षकी असल्याचे समोर आले आहे. तर राज्यात हीच एकशिक्षकी शाळांची संख्या सुमारे आठ हजार आहे. यंदाची संचमान्यता अद्याप अंतिम झाली नसल्याने यावर्षीचे चित्र अजून स्पष्ट झालेले नाही.
शिक्षण मंत्रालयाने सन 2024-25च्या संकलित केलेल्या माहितीमधून हे चित्र समोर आले आहे. बहुतांश एक शिक्षकी शाळा या ग्रामीण तसेच दुर्गम भागात असल्याचे दिसते. तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे शासनाचे धोरण आहे, या उद्देशाने ग्रामीण भागापर्यंत प्राथमिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, एकाच शिक्षकावर शाळेची संपूर्ण जबाबदारी पडत असल्याने एक शिक्षकी शाळा ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत अडथळा ठरत आहे. यावर शासनाने विचार करण्याची गरज आहे.
गुणवत्तेत अडथळा
एक शिक्षकी शाळांमध्ये सर्व कामे शिक्षकालाच करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होत आहे. असा शिक्षक रजेवर गेल्यास शाळा बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा शिक्षणात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे शासनाने या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
राज्यात आठ हजार शाळा
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालानुसार राज्यात 8152 एक शिक्षकी शाळा आहेत. तर, देशभरात एक शिक्षकी शाळांची संख्या 1 लाख 4 हजार 125 आहे. सन 2024-25च्या संकलित केलेल्या आकडेवारीनुसार एक शिक्षकी शाळांमध्ये सरासरी 34 विद्यार्थी असे प्रमाण असल्याचे दिसून आले आहे. देशातील एक शिक्षकी शाळांच्या संख्येच्या यादीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि झारखंड हे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.
254 मराठी शाळा एक शिक्षकी
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे सन 2024-25च्या संचमान्यतेवेळी असलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात गतवर्षी एक शिक्षकी शाळांची संख्या 316 होती. यात 254 मराठी, तर 58 कन्नड आणि चार ऊर्दू शाळांचा समावेश आहे. एक शिक्षकी शाळा असलेल्या तालुक्यांमध्ये सर्वाधिक शाळा जत तालुक्यातच आहेत
































































