रत्नपूर न.प. निवडणूक रणधुमाळीत मिंधेसेना – भाजपमध्ये लटकली ! भाजपने विश्वासघात केला; मिंध्यांचा आरोप

रत्नपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व शिंदे सेनेमध्ये चांगलीच लटकली असून, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिंदे सेनेचा विश्वासघात केला असल्याने त्यांना चांगला धडा शिकवणार असल्याचा इशारा शिंदे सेनेचे नेते माजी सभापती किशोर कुकलारे यांनी येथे आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत दिला.

राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी व शिंदे सेनेमध्ये युती असून या दोन्ही पक्षातील खदखद मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. राज्य पातळीवर सुरू असलेला बेबनाव स्थानिक पातळीवर आला असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकले आहेत. याविषयी बोलताना कुकलारे आणि म्हणाले की, रत्नपुर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेला सन्मान जनक वागणूक दिलेली नाही. उलट प्रभाग क्रमांक दोन मधील शिंदे सेनेचे उमेदवार लिंगायत यांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले त्याचप्रमाणे प्रभाग तीन मधील शिवसेनेच्या माजी नगरसेविकेच्या पतीला उमेदवारी दिली या सर्व बाबी शिंदे सेनेला खटकल्या असून निवडणुकीमध्ये विश्वासघातकी भारतीय जनता पार्टीला धडा शिकवण्याचा निश्चय शिवसैनिकांनी केला असल्याचे कुकलारे यांनी सांगितले.

कोणत्याही निवडणुका धनशक्तीवर जिंकण्याची सवय भारतीय जनता पार्टीला लागली असून सामान्य जनतेसोबत या पक्षाची फारकत झाली आहे. जनतेमध्ये आता जागृती होत असून भारतीय जनता पार्टीला आगामी काळामध्ये जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागणार असल्याचे कुकलारे यांनी सांगितले.

नगराध्यक्षपदासाठी नऊ तर, नगरसेवकपदासाठी 73 जण रिंगणात

रत्नपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून 12 पैकी तीन उमेदवारांनी तर नगरसेवक पदाच्या शर्यतीतून 85 उमेदवारांपैकी बारा उमेदवारांनी आपली उमेदवारी परत घेतली. उमेदवारी अर्ज परत घेतल्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात असून नगरसेवक पदाच्या 20 जागांसाठी 73 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.