
फुलंब्री नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी आकाशपाताळ एक करणारा भाजप न्यायालयात उताणा पडला ! भाजप उमेदवार सुहास शिरसाठ यांनी ठोंबरे यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळताच फुलंब्रीत शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष केला.
फुलंब्री नगर पंचायत ताब्यात घेण्यासाठी भाजपने हरतऱ्हेचे प्रयत्न करून पाहिले. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांच्या उमेदवारीला भाजपचे सुहास शिरसाठ यांनी आक्षेप घेतला. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी १८ नोव्हेंबर रोजी छाननीत राजेंद्र ठोंबरे यांचा अर्ज वैध ठरवला. राजेंद्र ठोंबरे यांना तीन अपत्ये असल्याने ते अपात्र ठरतात हा शिरसाठ यांचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळला.
निवडणूक अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळल्यानंतर सुहास शिरसाठ यांनी न्यायालयात धाव घेतली. राजेंद्र ठोंबरे यांच्या वतीने ए. एस. काझी, आर. एस. काझी आणि एफ. ए. पटेल यांनी बाजू मांडली. ठोंबरे यांच्या वतीने अनिकेत हरीश यादव या दत्तक मुलाचे सर्व दस्तऐवज न्यायालयासमोर मांडण्यात आले. अनिकेत हा जैविक अपत्य नसून कायदेशीररीत्या दत्तक घेतलेला मुलगा असल्याचे ठोंबरे यांच्या वतीने सांगण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी योगिता खटावकर यांनीही याच पुराव्यांच्या आधारे शिरसाठ यांचा आक्षेप फेटाळल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
न्या. एम. एस. देशपांडे यांच्या न्यायासनासमोर तब्बल तीन तास उभय बाजूने युक्तिवाद करण्यात आला. उपलब्ध दस्तऐवज, कागदपत्रांचा पुरावा ग्राह्य धरून न्या. देशपांडे यांनी सुहास शिरसाठ यांची याचिका फेटाळण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने आक्षेप याचिका फेटाळल्याने राजेंद्र ठोंबरे यांच्या उमेदवारीवरील टांगती तलवार दूर झाली आहे. न्यायालयाने याचिका फेटाळताच शिवसैनिकांनी फुलंब्रीत दिवाळीच साजरी केली.





























































