
चंद्रपूर शहरातील जनता करियर लॉन्चर नामक खाजगी कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. नीट परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्याने या निवासी संस्थेत प्रवेश घेतला होता.या घटनेने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून रामनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
चंद्रपूर शहरालगतच्या धानोरा या गावातील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय मुलाने जनता करिअर लॉन्चरच्या वसतिगृहात खोलीतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. हे क्लासेस चालवणारी संस्था शिक्षण क्षेत्रात नावाजलेली आहे. अशा संस्थेत ही घटना घडल्याने व्यवस्थापनावर आता शंका घेतली जात आहे. काही महिन्यापूर्वी मृतक विद्यार्थ्याने आपल्याला संस्थेतील कर्मचारी त्रास देत असल्याविषयी पालकांना माहिती दिली होती. घटनेनंतर वडिलांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या होस्टेलमधील सीसीटीव्ही ताब्यात घेतले आहेत. मुलाने किंवा त्याच्या वडिलांनी मात्र यापूर्वी कधीही व्यवस्थापनाची तक्रार केली नव्हती. त्यामुळे त्याला कुणी त्रास दिला, केव्हा दिला, कसा दिला, हे आम्हाला कसे कळणार, अशी भूमिका व्यवस्थापनाने व्यक्त केली. दरम्यान, धानोरा येथील सरपंचाने याप्रकरणी पीडित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. तर कुटुंबाने योग्य चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली. रामनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.






























































