
>> संध्या शहापुरे
जीवनात जितकी जास्त गुंतवणूक तितके दुःख अधिक, ताणतणाव अधिक आणि मिळवलेलं गमावण्याचं दुःखही अधिक. सुखी माणसाच्या सदऱयाचा शोध आजही थांबलेला नाही. जीवनात समाधानी नसलेली माणसं दुसरा कसा सुखात याचा विचार करून अधिक दुःखी होत असतात. अफाट महत्त्वाकांक्षा, अवाक्याबाहेरची स्वप्न पूर्ण करता करता स्वतची दमछाक करून घेतात. विचार न करता पळत्या गोष्टींच्या पाठी लागतात. हव्यास आणि ध्येय यातला फरक समजून घेत नाहीत. टार्गेट ठरवताना कॅपॅसिटी विचारात घेत नाहीत. हेच पूर्व संचित भोगवटय़ाला कारणीभूत होतं. सुखाच्या कल्पनांना आवर घालून जीवनात समाधान हवे की, सतत अस्वस्थ, बेचैन, अपूर्ण, असमाधानी राहायचं आहे? ते तुम्हीच ठरवा. पाडगावकर म्हणतात… पेला अर्धा भरला आहे असेही म्हणता येतं. पेला अर्धा सरला आहे असेही म्हणता येतं, सरला आहे म्हणायचं की भरला आहे ते तुम्हीच ठरवा सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत? तुम्हीच ठरवा




























































