
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 रहिवाशांना नव्या घराची चावीवाटप करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला 12 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार म्हाडाने कार्यक्रमाची तयारीदेखील केली. काही कारणास्तव ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता दहा दिवस उलटून गेले तरी चावीवाटपासाठी मुख्यमंत्र्यांकडून नवी तारीख मिळालेली नाही. त्यामुळे नव्या घराचा ताबा कधी मिळणार, याकडे बीडीडीवासीय आशेने डोळे लावून बसले आहेत.
नायगाव बीडीडी येथील 42 चाळींचा पुनर्विकास करून 3344 रहिवाशांचे पुनर्वसन 23 मजली 20 पुनर्वसन इमारतीमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यात 8 तर दुसऱया टप्प्यात 12 इमारती उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्र. 8 मधील टॉवर क्र. 4 ते 8 या इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मुंबई पालिका निवडणुकांसाठी कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे चावीवाटपाचा कार्यक्रम लवकरात लवकर घ्यावा, अशी रहिवाशांची मागणी आहे.






























































