
पर्थ कसोटीत पहिल्याच दिवशी १९ फलंदाज धारातीर्थी पडल्याने दुसऱ्या दिवसातील घडामोडीकडे अवघ्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. इंग्लंडला पहिल्या डावात ४० धावांची आघाडी मिळाली होती. मात्र, इतक्यात हार मानतील ते ऑस्ट्रेलियन खेळाडू कसले. त्यांनी इंग्लंडचा दुसरा डाव १६४ धावांवर गुंडाळून सामन्यात रंगत निर्माण केली.
ऑस्ट्रेलियाला २०५ धावांचे लक्ष्य मिळाले. उस्मान ख्वाजाच्या गैरहजेरीत सलामीला बढती मिळालेल्या ट्रॅव्हिस हेडचे वादळ पर्थवर घोंगावले. त्याच्या शतकी खेळीच्या वादळात इंग्लिंश गोलंदाजीचा अक्षरशः पाचोळा उडाला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्याच दिवशी प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेतील पहिली कसोटी जिंकून इतिहास घडविला. हेडने विजयाचा कळस चढविला असला, तरी दोन्ही डावांत १० बळी टिपत विजयाची पायाभरणी करणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या विजयाचा शिल्पकार ठरला.
इंग्लंडची दुसऱ्या डावात शरणागती
इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. झेंक क्रॉली पुन्हा शून्यावर बाद झाला. त्यानंतर बेन डकेट २८ आणि ओली पोप ३३ धावा करून बाद झाले. जो रूट ८ धावांवर बोल्ड झाला. हॅरी ब्रुक शून्यावर, तर कर्णधार बेन स्टोक्स २ धावांवर बाद झाला. जेमी स्मिथने १५ धावा केल्या. मात्र, गस अॅटकिंसन आणि ब्रायडन कार्स यांनी ८व्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडचा डाव ३४.४ षटकांत १६४ धावांत आटोपला.
इंग्लंडने १७२ धावा केल्यानंतर
ऑस्ट्रेलियाला ४५.२ षटकांत १३२ धावांवर रोखून पहिल्या डावात ४० धावांची आघाडी घेतली. मात्र, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा दुसरा डाव ३४.४ षटकांत गुंडाळून कसोटीत नाट्यमयरीत्या पुनरागमन केले, मग ट्रॅव्हिस हेडच्या झंझावाती ६९ चेंडूंतील शतकी खेळीच्या जोरावर २०५ धावांचे लक्ष्य कांगारू संघाने २८.२ षटकांत सहज गाठले. हेडने ८३ चेंडूंमध्ये १२३ धावा ठोकल्या, तर मार्नस लाबुशेनने ४९ चेंडूंवर ५१ धावा करीत महत्त्वाची साथ दिली.
९ धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपला
ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाची ९ बाद १२३ धावसंख्येवरून शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. नॅथन लायन ४ धावांवर बाद झाला आणि ९ धावांची भर घालून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४५.२ षटकांत १३२ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ५, कार्सने ३ आणि जोफ्रा आर्चरने २ बळी घेतले.

























































