
सह्याद्री परिसरातील वैज्ञानिक वन्यजीव व्यवस्थापन, तातडीची पशुवैद्यकीय मदत, प्राणीसंख्या व्यवस्थापन आणि मानव–वन्यजीव संघर्ष निवारण मजबूत करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यात औपचारिक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या करारांतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि रेस्क्यू एकत्रितपणे वन्यजीव आरोग्य व पशुवैद्यकीय सेवा, वैज्ञानिक पद्धतीने वन्यजीव पकड व स्थलांतर तसेच आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली बळकटीकरण यावर कार्य करतील. प्रशिक्षित पशुवैद्यकीय आणि तांत्रिक पथकांची नेमणूक, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षित कार्यपद्धती, मुक्ततानंतर निरीक्षण प्रणाली आणि आघाडीच्या कर्मचाऱयांसाठी संरचित प्रशिक्षण कार्यक्रम हे या सहयोगाचे प्रमुख घटक असतील. दोन्ही संस्था सह्याद्री परिसरातील वन्यजीव संख्यावाढ उपक्रम आणि दीर्घकालीन संवर्धन नियोजनालाही सक्रिय पाठबळ देतील.
सह्याद्री परिसरातील जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी विज्ञानाधारित नियोजन, कुशल तांत्रिक पथके आणि व्यावसायिक पशुवैद्यकीय साहाय्य अनिवार्य आहे. या भागीदारीमुळे आमची क्षेत्रीय क्षमता वाढेल, हस्तक्षेपांची गुणवत्ता अधिक सक्षम होईल आणि प्रत्येक कार्य सर्वोच्च संवर्धन मानकांनुसार पार पाडता येईल, असे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक तुषार चव्हाण यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले.
संवर्धनाचे काम होईल परिणामकारक!
सह्याद्री हा महाराष्ट्रातील जैववैविध्य वारसा लाभलेला परिसर असून, त्याच्या संवर्धनासाठी साहाय्य करणे हे आमच्या ध्येयाशी सुसंगत आहे. सुरक्षित, वैज्ञानिक व प्राणीकल्याणाधिष्ठत पद्धतींनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या संयुक्त प्रयत्नांमुळे क्षेत्रातील कारवाई अधिक सुरक्षित, पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम आणि संवर्धनाचे परिणाम अधिक दृढ होतील, अशी आम्हाला आशा आहे, अशी प्रतिक्रिया रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक व अध्यक्षा नेहा पंचमिया यांनी या संदर्भात बोलताना दिली.

























































