मतदार यादीत घोळ घालणाऱ्या निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! आदित्य ठाकरे यांची मागणी

मुंबईच्या प्रारुप मतदार यादीमध्ये प्रचंड घोळ असून तो घोळ घालणाऱया निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केली. अन्यथा रस्त्यावर उतरू आणि या गोंधळाला जबाबदार असणाऱया अधिकाऱयांच्या निलंबनासाठी न्यायालयात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

आदित्य ठाकरे आणि मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची यासंदर्भात भेट घेतल्यानंतर शिवालय येथे पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदार यादीवाचन सुरू केले तेव्हा बराच गोंधळ असल्याचे समोर आले आहे, असे ते म्हणाले.

मुंबईतील एका वॉर्डात 48 हजार मतदार होते ते नव्या यादीत 42 हजार झाले आहेत, मग 6 हजार गेले कुठे, असे उदाहरणही आदित्य ठाकरे यांनी दिले. आणखीही धक्कादायक गोष्टी यादीत असून येत्या काही दिवसांत त्या समोर आणू, असा इशाराही त्यांनी दिला. ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्येही असा घोटाळा झाल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षाच्या वॉर्डात घुसून मतदार पळवले

मतदार यादीमध्ये काय घोळ आहेत त्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी या वेळी दिली. विरोधी पक्षांचे वॉर्ड डळमळीत करण्यासाठी त्यांच्या वॉर्डातील इमारती सत्ताधाऱयांच्या वॉर्डात घुसवून मतदारच पळवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. साकीनाका येथील वॉर्ड क्रमांक 162 व 163मध्ये मधोमध असणाऱया इमारतीच दुसऱया वॉर्डात हलवण्यात आल्या आहेत. सत्ताधाऱयांच्या वॉर्डात मात्र काहीच हलवाहलवी करण्यात आलेली नाही, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. भांडुप, शिवडी, दिंडोशी, वरळी, माहीम, कुलाबा, वांद्रे पूर्व आदी वॉर्डांचा त्यात समावेश असल्याचे ते म्हणाले. मतदार यादीत इतका गोंधळ होताना निवडणूक यंत्रणा सांभाळणारे महापालिकेतील अधिकारी अजगरासारखे झोपले होते का, असा संतप्त सवालही त्यांनी केला.

आदित्य ठाकरे यांनी सादर केलेली आकडेवारी

  • मुंबईत एका घरात दहापेक्षा जास्त मतदार राहात असलेली 26319 घरे आहेत. त्यात 8 लाख 32 हजार 326 लोक राहतात.
  • दहापेक्षा अधिक मतदार एका घरात राहत असतील तर निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे त्याची तपासणी केली गेली पाहिजे. काही घरांमध्ये राहणाऱया मतदारांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही, त्यांचे जात-धर्मही वेगवेगळे आहेत. त्याचीही खातरजमा आयोगाने केलेली नाही.
  • 18पेक्षा कमी किंवा 100पेक्षा जास्त वय असलेले 6076 लोक आहेत. त्यांचे मतदान कसे होणार?
  • 2500 मतदारांना एपिक नंबरच नाहीत.
  • 6 लाख 97 हजार 887 मतदारांना घर क्रमांक नाहीत.

हमीपत्रात दुरुस्ती करा

संभाव्य दुबार मतदारांकडून दोन ठिकाणी मतदान केले जाऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून हमीपत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु ते हमीपत्र फक्त एकाच दिवसापुरते मर्यादित आहे. दुसऱया दिवशी तो इतरत्र जाऊन मतदान करू शकतो. त्यामुळे हमीपत्रातही दुरुस्ती व्हायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. भाजपला मुंबईतील निवडणूक पुढे ढकलून निवडणुकीपूर्वी सर्व भूखंड बिल्डरांना विकायचे आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

मतचोरीच्या मुद्दय़ावर विरोधी पक्ष एकत्र

निवडणूक आयुक्तांना दिलेल्या पत्रावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्याच सह्या आहेत, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांच्या सह्या नाहीत याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले असता, मतचोरीच्या मुद्दय़ावर आम्ही सर्व एकत्र आहोत, आज जे उपलब्ध होते ते आले, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते अंबादास दानवे, आमदार अॅड. अनिल परब, मनसे नेते बाळा नांदगावकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण
उपस्थित होते.