
घाटकोपर पूर्वच्या पंतनगरमध्ये आज दुपारी एका घरात सिलिंडरच्या गळतीनंतर उडालेल्या आगीच्या भडक्यात सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये एक जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर पालिकेच्या घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साईनगरच्या चाळ नं. 10च्या ग्राऊंड प्लस एक मजल्याच्या दहा बाय दहा आकाराच्या घराच्या वरच्या मजल्यावर दुपारी 2.17 वाजण्याच्या सुमारास गॅस गळती झाली. यानंतर आगीचा भडका उडाला. या ठिकाणचे इलक्ट्रिक वायरिंग, गॅस स्टोव्ह, घरगुती सामान, कपडे, रबर आदी जळावू साहित्यामुळे आग आणखीनच भडकली. या आगीत प्रतीक मुखिया (10), गौरी मुखिया (10), प्रशांत विश्वकर्मा (9), पूजा मुखिया (6), दलत मुखिया (6) आणि नागेश्वर मुखिया (45) हे जखमी झाले. या सर्वांवर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवसेना मदतीला धावली
आगीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या सूचनेनुसार घाटकोपर विधानसभा प्रमुख प्रकाश वाणी, महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे, शाखाप्रमुख मयुरेश नागदास यांनी घटनेची माहिती मिळताच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी मदत केली. या वेळी राष्ट्रवादीच्या राखी जाधव, सतीश पवार, लोकेश फेफडे, राजा पवार, शैलेश यादव, लता फाळके, मंगेश शिर्के, चंद्रकांत हळदणकर यांनीदेखील जखमींना आवश्यक मदत केली.

























































