
मुंबईतील पदपथावरील फेरीवाले तसेच अतिक्रमण हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. त्यानंतरही पालिका प्रशासनाकडून पदपथावरील अतिक्रमणांकडे डोळेझाक सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या एफ साऊथ विभागात येणाऱया गोविंदजी केणी मार्गावर दुकानदारांनी केलेल्या अतिक्रमणामुळे फुटपाथ गायब झाले आहेत. ड्रेनेज लाइनवरही बांधकाम केल्याने त्याची सफाई नीट होत नाही. परिणामी या परिसरातून ये-जा करणाऱया नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या एफ साऊथ विभागातील गोविंदजी केणी मार्ग, गंगाबाई मेन्शन व आसपासच्या परिसरात पदपथावर झालेल्या अतिक्रमणाचा नाहक त्रास शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच या परिसरात असलेल्या रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱया नागरिकांबरोबर सर्वसामान्य रहिवाशांना होत आहे. सकाळ-संध्याकाळी गर्दीच्या वेळी तर पदपथावरून चालणे मुश्कील होऊन बसते. यासंदर्भात स्थानिकांनी पालिकेकडे वारंवार तक्रार केल्यावरही कोणतीही ठोस कारवाई पदपथावर अतिक्रमण करून दुकानदारांनी बळकावलेली जागा रिकामी करण्यासंदर्भात कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
कारवाई टाळण्यासाठी दिशाभूल
गोविंदजी केणी मार्गालगतच्या पदपथावर करण्यात आलेल्या अतिक्रमणाबाबत किशोर नाईक हे सातत्याने पालिका तसेच सरकार दरबारी पाठपुरावा करत आहेत. माहिती अधिकार तसेच अन्य मार्गाने संबंधित कार्यालयात पत्रव्यवहार करून वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिल्यावरही दिशाभूल करणारी उत्तरे देऊन संबंधित अधिकारी कारवाईस टाळाटाळ करताना दिसत आहेत.
मे 2025 मध्ये नोटीस, पण कारवाई नाही
रस्त्यालगत असणाऱया ज्या दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण करून ती जागा दुकानाच्या आत घेतली आहे. त्यांना पालिकेच्या इमारत व कारखाने विभागाकडून 15 मे 2025 रोजी नोटीस देण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत अतिक्रमण केलेली जागा मोकळी करण्याबाबत कारवाई करण्यात आलेली नाही.

























































