क्रिकेटच्या मैदानातून व्यसनमुक्तीचा दमदार संदेश, आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दहा सामन्यांचा थरार

आमदार चषकांतर्गत आयोजित आमदार हारून खान क्रिकेट लीगच्या दुसऱया दिवशी क्रिकेटच्या जोशात आयोजकांनी मैदानावरून ‘ड्रग्ज आणि व्यसनमुक्ती’चा प्रभावी एल्गार केला. सामाजिक बांधिलकीची सांगड घालत आयोजित सलग 10 रोमांचक सामन्यांमधून खेळाडूंनी कौशल्याचा जलवाही दाखवला.

नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याचे चिटणीस मोहम्मद इम्तियाज यांनी आमदार हारून खान यांच्यासोबत केलेल्या सहकार्यामुळे या लीगला सामाजिक मोहिमेचे रूप लाभले. क्रिकेटप्रेमी तरुणांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवण्याचे काम या उपक्रमातून उल्लेखनीय पद्धतीने होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात हजारो प्रेक्षकांनी रात्री उशिरापर्यंत सामने पाहत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. दरम्यान, स्पर्धेच्या थेट प्रक्षेपणाला यूटय़ूबवर तब्बल 1.5 लाखांहून अधिक ह्यूज मिळत डिजिटल माध्यमातूनही व्यसनमुक्तीचा संदेश व्यापक स्तरावर पोहोचला आहे.

जागतिक दर्जाच्या सुविधा, सामाजिक संदेशाची जोड आणि राष्ट्रीय स्तरावरील सुविधांनी सजलेल्या मैदानात तरुणांना व्यावसायिक दर्जाचे क्रीडा वातावरण लाभले. केवळ खेळाची गुणवत्ता नव्हे, तर ‘व्यसनाला नाही’ म्हणण्याचा जोरदार संदेश देणारी ही लीग वर्सोवा परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.