
>> सुरेश जंपनगिरे
जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे ढोल बडवणाऱ्या भाजपला जिल्हय़ातील महत्त्वाच्या चार नगर परिषदेसाठी अध्यक्षपदाचा उमेदवारच मिळाला नाही. जिल्हास्तरीय पदाधिकाऱयांमध्ये असलेली बेदिली, कार्यकर्त्यांवर दाखवलेला अविश्वास यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लढण्याअगोदरच भाजपवर मैदानातून पळ काढण्याची नामुष्की ओढवली आहे.
परभणी जिल्ह्य़ात पाथरीतून ‘कमळ’ हद्दपार झाले तर मानवत, पूर्णा आणि सोनपेठ या नगर परिषदांमध्ये ‘कमळ’ उमलण्याअगोदरच सुकून गेले! मानवत, पूर्णा आणि सोनपेठ येथे भाजपने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारच दिले नाहीत. विशेष म्हणजे या चारही शहरांमध्ये भाजपकडून इच्छुकांच्या रांगा लागल्या होत्या. परंतु भाजपच्या जिल्हा नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वासच दाखवला नाही. त्यामुळे भाजपचे इच्छुक इतर पक्षात पळाले. तर शिल्लक राहिलेल्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी मांडवली केल्याचा गंभीर आरोप केला.
भाजपमध्ये भाऊबंदकी उफाळून आल्यानंतर सुरेश भुमरे यांनी सारवासारव केली. माघारीचा निर्णय आपला नसून वरिष्ठांचा असल्याचे सांगून त्यांनी किटाळ झटकले. पाथरीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार न देण्याचा निर्णय ग्रामीण निवडणूक प्रभारी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि जिल्हा निवडणूक समन्वयक तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या सहमतीने घेतल्याचे सांगीतले. भूमरे यांनी थेट पालकमंत्र्यांचे नाव घेतल्यामुळे हा वाद आता स्थानिक नेतृत्वाच्या मनमानीपुरता मर्यादित न राहता पक्षाच्या धोरणात्मक निर्णयावर येऊन थांबला. परभणीतील नाराजीची दखल भाजपा प्रदेश निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनपुळे यांनी घेतली. बावनपुळे यांनी तात्काळ या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे.
मानवत, पूर्णा, सोनपेठमध्येही नाराजीचा स्फोट
पाथरीप्रमाणेच मानवत, पूर्णा आणि सोनपेठमध्येही भाजपकडे उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी गर्दी होती. उमेदवारांना देण्यासाठी जिल्हाध्यक्षांकडे एबी फॉर्म पाठवण्यात आले होते. परंतु जिल्हाध्यक्षांनी त्या एबी फॉर्मचा बाजारच मांडला. त्यामुळे भाजपच्या शिस्तप्रिय प्रतिमेचे धिंडवडे निघाले. जेव्हा प्रकरण अंगाशी आले तेव्हा पालकमंत्र्यांवर जबाबदारी ढकलून भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी हात झटकले.

























































