प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत 15 दिवसांनी वाढवा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी 20 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झाली असून त्यावर हरकती व सूचना घेण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अवघी 7 दिवसांची मुदत अत्यंत कमी असून ती 15 दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने आज राज्य निवडणूक आयोगाकडे केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र दिले.  अनेक पालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पद्धतीने फोडलेल्या नाहीत. बऱ्याच मतदारांची नावे इतर भागांमध्ये गेलेली आहेत. ही संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. हरकती घेण्याची पद्धतदेखील अत्यंत किचकट आहे. प्रत्येक व्यक्तीने विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असून सोबत आधारकार्ड जोडायचे आहे. कोणत्याही व्यक्ती वा राजकीय पक्षाने निवडणुकीच्या सक्षम अधिकाऱयाच्या निदर्शनास योग्य ती हरकत व सूचना आणून दिल्यास अनेक व्यक्तींबद्दलीची तक्रार स्वीकारली पाहिजे, मात्र तसे होताना दिसत नाही. राजकीय पक्षांच्या व प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे. प्रभागातील नागरिकांची संख्या जास्त असल्याने याद्या तपासण्यास वेळ लागणार आहे म्हणून वेळ वाढवून द्यावी, असे या पत्रात म्हटले आहे.