कोल्हे–विखे वाद जाहीर सभेत चव्हाट्यावर

कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्येच खरी लढत रंगण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून, भाजप आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय तणाव आता सार्वजनिक पातळीवर पोहोचला आहे. आज राष्ट्रवादीच्या प्रचार शुभारंभानंतर भाजपच्या प्रचाराची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्याच सभा मंचावर विवेक कोल्हे आणि विखे यांच्यातील वाद चव्हाटय़ावर आला.

राष्ट्रवादीकडून आमदार आशुतोष काळे यांनी काका कोयटे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर झालेल्या सभेत विवेक कोल्हे यांनी, ‘काकाचा आका कोण, हे आम्हाला माहीत आहे’, असे नाव न घेता पालकमंत्री डॉ. विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यावर लगेचच प्रत्युत्तर देताना विखे म्हणाले, ‘बोलताना शब्द जपून वापरावेत. अनुभव नसलेले लोक राजकारणात येतात आणि अशा पद्धतीने बोलतात. जनतेने सर्व पाहिले आहे’, असा थेट सल्ला देत कोल्हेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

या घटनेमुळे भाजपमधील दोन नेत्यांमधील अंतर्गत मतभेद मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत उघडकीस आल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोपरगावच्या राजकारणात सुरू असलेला हा संघर्ष आगामी निवडणुकीत कोणते वळण घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.