विद्यार्थ्यांच्या एसटी प्रवासाची ससेहोलपट थांबणार; महामंडळाची ‘हेल्पलाइन’ सुरू, राज्यातील सर्व 31 विभागांतील विभाग नियंत्रक संपर्कात राहणार

ग्रामीण भागात शाळकरी मुलांची एसटीच्या प्रवासात होणारी ससेहोलपट अखेर थांबणार आहे. एसटी वेळेवर न येणे, अचानक फेरी रद्द होणे अशा अडचणींच्या काळात मुलांना योग्य ती मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळाने 1800221251 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. राज्यातील सर्व 31 विभागांतील एसटीचे विभाग नियंत्रक शाळा-महाविद्यालयांच्या संपका&त राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणार आहेत.

एसटी बसेस वेळेवर न सुटणे, गर्दी असल्यामुळे थांब्यावर न थांबणे, बसेस उशिरा येणे अथवा अचानक रद्द होणे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी एसटी प्रशासनाकडे तक्रारी केल्या. संध्याकाळी शाळा-महाविद्यालय सुटल्यानंतर किमान एक तासात मुले घरी पोहोचणे अपेक्षित असते, परंतु बसेस वेळेवर न आल्याने अथवा अचानक रद्द झाल्याने मुलांना घरी पोहोचण्यास खूप उशीर होतो. त्याचा मुलांच्या अभ्यासावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेत एसटी महामंडळाने 1800221251 या क्रमांकाची हेल्पलाईन सुरू केली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी हेल्पलाईनबाबत अधिकृत घोषणा केली. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यातील एसटीच्या 31 विभागांतील सर्व विभाग नियंत्रकांचे दूरध्वनी संपर्क क्रमांक शाळा-महाविद्यालयांना देण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत शाळा-महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी विभाग नियंत्रकांना संपर्क करून समस्या मांडू शकणार आहेत.

नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकांवर
एसटीच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित क्षेत्रातील आगार व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार सायंकाळी मुख्य बसस्थानक आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असलेल्या थांब्यावर संबंधित आगाराच्या पर्यवेक्षकांनी गणवेशात थांबून वाहतुकीचे नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.