
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी रात्री उशिरा एक होंडा कार डिव्हायडरला धडकली. यानंतर कारने पेट घेतला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि अग्नीशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. कारमधील सर्वजण सुखरुप बचावले आहेत.
अपघातग्रस्त कार वरळीहून वांद्रेच्या दिशेने जात होती. कारचे ब्रेक निकामी झाल्याने आणि वेग जास्त असल्याने कारने नियंत्रण गमावले आणि डिव्हायडरवर आदळली. यानंतर कारने पेट घेतला, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. कारमध्ये तीन ते चार लोक होते. सुदैवाने सर्वजण वेळीच कारमधून बाहेर पडल्याने बचावले आहेत. वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाने तातडीने आग आटोक्यात आणली.

























































