हाँगकाँगमध्ये 7 इमारतींना भयंकर आग, 44 जणांचा होरपळून मृत्यू तर 300हून अधिक बेपत्ता

हाँगकाँगमध्ये ताई पो येथे अनेक इमारतींना भयंकर आग लागल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली आहे. या आगीत 44 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 300हून अधीक जण बेपत्ता आहेत. आग इतकी भीषण होती की ती 7 इमारतींमध्ये पसरली. याप्रकरणी तीन संशयितांना अटक केली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अग्निशमन दलाच्या हवाल्याने सांगण्यात आले की, अनेकजण त्या आगीत अडकले असून आगीचे लोट दिसत आहेत. एफएसडीने सांगितले की बुधवारी दुपारी 2.51 वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली आणि दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास क्रमांक 4 अलार्म फायर घोषित केला.  अग्निशमन दलाचे काम युद्धपातळीवर सुरु असून  इमारतींमधून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग शहरातील ताई पो जिल्ह्यातील कॉम्प्लेक्सच्या बाहेर बांबूच्या मचानात पसरली. ताई पो हा हाँगकाँगच्या उत्तरेकडील भागात, चीनच्या प्रमुख शहर शेन्झेनच्या सीमेजवळ एक परिसर आहे. आतापर्यंत सुमारे 90 टक्के लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अजूनही अनेक लोकं बेपत्ता आहेत. घटनेनंतर अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. ही आग लेव्हल 5 म्हणून वर्गीकृत करण्यात आली आहे, जी सर्वात मोठी आग आहे. शहराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या तैपो जिल्ह्यात, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे . आग लागल्यानंतर अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शिवाय रहिवाशांना घरातच राहण्याचे, दरवाजे आणि खिडक्या बंद करण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन केले आहे.