पुणे मेट्रो फेज-2 ला केंद्राची 9,857 कोटींची मंजुरी; 28 स्थानकांमुळे वाहतूक कोंडी होणार कमी

पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्र मंत्रिमंडळाची 9,857.85 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी मिळाली आहे. या टप्प्यात 31.64 किमी लांबीचे दोन नवे कॉरिडॉर आणि 28 उंचावरील स्थानकांची उभारणी करण्यात येणार आहे. या विस्तारामुळे पुणे दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता यांच्याप्रमाणेच 100 किमीपेक्षा जास्त किंवा त्याच्या जवळपास मेट्रो नेटवर्क असलेल्या शहरांच्या यादीत समाविष्ट होणार आहे.

लाइन 4 आणि 4A यांच्या मंजुरीनंतर पुण्याचे एकूण मेट्रो जाळे 100 किमीच्या पुढे जाणार आहे. हा विस्तार पूर्व, दक्षिण आणि पश्चिम पुण्यातील आयटी पार्क, व्यापारी पट्टे, शिक्षण संस्था आणि दाट लोकवस्तीच्या भागांना जोडणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कामकाज मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एका ‘पोस्ट’मधून ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, “पुणे मेट्रो फेज 2 साठी 9,857.85 कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी मिळाली आहे. 31.64 किमी नवीन मार्ग आणि 28 स्थानकांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतुकीला मोठा चालना मिळेल. महामेट्रो ही प्रकल्पाची अंमलबजावणी पाच वर्षांत करणार असून केंद्र, राज्य आणि बाह्य वित्तपुरवठा एजन्सी या प्रकल्पात भाग घेणार आहेत.

लाइन 4 ही 25.518 किमी लांबीची असून खराडी आयटी पार्क ते खडकवासला दरम्यान धावेल. तर लाइन 4A ही 6.118 किमीची स्पर लाइन असून नळस्टॉप–वॉरजे–माणिक बाग या मार्गावर असेल. या दोन्ही मार्गांची स्वारगेट (लाइन 1), नळस्टॉप (लाइन 2) आणि खराडी बायपासवरील विद्यमान व मंजूर लाईन्सशी जोडणी होणार आहे.

या कॉरिडॉरमुळे सोलापूर रोड, सिंहगड रोड, मगरपट्टा रोड, कर्वे रोड, मुंबई–बेंगळुरू महामार्ग अशा अत्यंत कोंदट मार्गांना पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रकल्पामुळे खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन हरित वाहतुकीला चालना मिळेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. 2028 मध्ये या मार्गांवरील सुरुवातीचा दैनंदिन प्रवासीभार सुमारे 4.09 लाख असल्याचे अंदाज असून 2058 पर्यंत तो 11.7 लाखांहून अधिक होईल.