
आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुरडीला भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना आज दुपारी भिवंडीच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम उड्डाणपुलावर घडली. खादीजा शेख (६) असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून तिचे वडील डॉ. उमर शेख हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातप्रकरणी ट्रकचालक सिराज कुरेशी याला पोलिसांनी अटक केली आहे.
नदी नाका परिसरातील फरिदाबाग येथे डॉ. उमर शेख हे राहतात. त्यांची मुलगी निजामपूर येथील माझरीन इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होती. आज नेहमीप्रमाणे ते आपल्या मुलीला शाळेतून बाईकने घरी नेत होते. त्यांची दुचाकी उड्डाणपुलावर येताच भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की खादीजा ही ट्रकच्या चाकाखाली चिरडली गेली, तर उमर शेख हे विरुद्ध दिशेला कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

























































