बीडमध्ये कमळ-घड्याळ्यात जुंपली, महाविकास आघाडी सेफ झोनमध्ये

बीड नगर पालिका निवडणुकीच्या मैदानात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आगपाखड करत आहेत. टोकाची भाषा बोलली जात आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकीकड महायुतीत संघर्षाचे नाट्य रंगले असताना दुसरीकडे मात्र तुतारी आणि मशाल सेफ झोनमध्ये पोहचले आहेत.

बीड नगर पालिका निवडणुक खर्‍या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये उमेदवारांची सुनामी आली. चौरंगी, पंचरंगी लढती काही वॉर्डामध्ये होत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मोठे नाराजी नाट्यही घडले. अनेकांनी पक्षांतर केले. या सगळ्या गोंधळामध्ये अरबळून गेला आहे. त्यातच महायुतीतला राजकीय संघर्ष बीडमध्ये पाहाण्यास मिळत आहे. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केल्यानंतर वादाची ठिणगी पडली. सगळे एबी फॉर्म माझ्याकडे द्या, पक्ष काय याच्या काकाचा आहे का? असा सवालच जाहीर सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी योगेश क्षीरसागरांना विचारल्यानंतर पक्ष माझ्या काकाचा नाही, पण तो तुमच्या काकांचा आहे. निट सांभाळा असा सल्ला योगेश क्षीरसागरांनी दस्तुरखुद्द अजित पवारांना दिला. बीड नगर पालिका निवडणुकीमध्ये गेवराईच्या पंडितांनी लक्ष घातलेले क्षीरसागरांना पटले नाही आणि पंडित-क्षीरसागर यांच्यात राजकीय वाद पुन्हा सुरू झाला. बीडच्या राजकारणात लक्ष घालणार्‍यांना पाडळशिंगीच्या पुढे हद्दपार करू असा इशारा योगेश क्षीरसागरांनी नाव न घेता विजयसिंह पंडितांना लगावला तर राष्ट्रवादीने ज्याला विधानसभेची उमेदवारी दिली, ९५ हजार मते मिळवून दिली. त्याने कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठित खंजीर खुपसून पळ काढला अशा शब्दात आ.विजयसिंह पंडितांनी योगेश क्षीरसागरांवर निशाना साधला. राज्यात सत्तेत असणार्‍या या महायुतीतील भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये बीडमध्ये राजकीय द्वंद पेटले आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

एकीकडे भाजपा-राष्ट्रवादीचे हे नाट्य रंगले असताना दुसरीकडे मात्र आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची घोडदौड सुरू आहे. कोणत्याही वादात न पडता, कोणावरही आरोप न करता थेट मतदारांशी संवाद साधून घराघरात पोहचण्याचे काम संदीप क्षीरसागर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करत आहे. यामुळेच तुतारीचा आवाज बीड नगर पालिकेवर वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.