पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या

कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना आज वांद्रे पूर्व परिसरात घडली. नजमा ऊर्फ नाजो वार्शी आणि नवाब वार्शी अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

नवाब हा पत्नी नजमासोबत वांद्रेच्या बेहरामनगर येथे राहत होता. त्या दोघांचा देखील दुसरा विवाह आहे. नवाज हा रिक्षा चालवण्याचे काम करायचा. तो अनेकदा कामावर जात नव्हता. त्यावरून त्याचे पत्नी नजमासोबत खटके उडत होते. घरखर्चाला पैसे देत नसल्याने त्यांच्यात गेल्या पंधरा दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे नजमा ही माहेरी निघून गेली होती. तेव्हा नवाबने तिला घरखर्चासाठी पैसे देण्याचे सांगितले होते. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून ती घरी आली होती, मात्र त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. रागाच्या भरात त्याने नजमाची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या केली. आज सायंकाळी नजमाची आई तिच्या घरी आली. तिने दरवाजा ठोकला, मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने याची माहिती निर्मलनगर पोलिसांना दिली. त्यानंतर निर्मलनगर पोलीस घटनास्थळी आले. अग्निशमन दलाच्या मदतीने दरवाजा तोडला तेव्हा ते दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.