
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना परकीय चलन नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. यामध्ये पिनराई विजयन यांच्यासह त्यांचे सचिव आणि माजी अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
केरळच्या मुख्यमंत्र्यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) पाठवलेली ही नोटीस 2019 सालचा मसाला बाँड प्रकरणातील 468 कोटींच्या व्यवहारांशी संबंधित आहे. ईडीच्या मते, बाँडमधून मिळालेल्या रक्कमेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये, ED ने बाँडच्या रक्कमेचा वापर आणि FEMA नियमांचे पालन यासंबंधीच्या तपासासाठी माजी अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांना समन्स बजावले होते.
केरळ मसाला बाँड:
मसाला बाँड हे हिंदुस्थानबाहेर जारी केलेले बाँड आहेत, मात्र हे बाँड स्थानिक चलनाऐवजी हिंदुस्थानी चलनात दिले जातात. केरळ हे 2019 मध्ये असे बाँड जारी करणारे पहिले राज्य ठरले होते.
केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड (KIIFB )ने लंडन स्टॉक एक्सचेंज वर आपल्या पहिल्या मसाला बाँडद्वारे अंदाजे 2 हजार कोटी जमा केले होते. हा निधी राज्याच्या विकासासाठी 50 हजार कोटी उभे करण्याच्या मोठ्या योजनेचा भाग म्हणून, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी वापरण्याचा उद्देश होता. 2019 साली संस्थेने त्यांच्या पहिल्या मसाला बाँड जारी करून २,150 कोटी रुपये उभारले होते.
























































