मुंबईत 15 टक्के पाणीकपात रद्द

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी मुंबई महानगरात येणार असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने 3 व 4 डिसेंबर रोजी 14 वॉर्डमध्ये लागू केलेली 15 टक्के पाणीकपात रद्द केली आहे.

तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी 2750 मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम पालिकेमार्फत नियोजित आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम यामध्ये होणार आहे. या कारणाने बुधवार, 3 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून गुरुवार, 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 14 प्रशासकीय विभागांमध्ये पाणीपुरवठय़ात 15 टक्के कपात लागू करण्याचे नियोजन होते. यामुळे मुंबई शहर विभागातील  14 वॉर्डमध्ये ही पाणीकपात केली जाणार होती. मात्र ही पाणीकपात आता रद्द करण्यात आली आहे.