अरे देवा… बोगद्यात बंद पडली मेट्रो अन् बत्ती झाली गूल; प्रवाशांनी रुळावरून चालत गाठले पुढचे स्थानक

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये मंगळवारी सकाळी मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. विम्को नगर डेपोकडे जाणारी ब्लू लाईनची एक मेट्रो अचानक बोगद्यात बंद पडली. सेंट्रल मेट्रो आणि हाय कोर्ट स्टेशनच्या दरम्यान एका सबवेमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही मेट्रो थांबली.

ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो बंद पडल्यामुळे कार्यालयात आणि कॉलेजला जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. मेट्रो थांबताच डब्यातील बत्तीही गूल झाली त्यामुळे प्रवाशांना मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडामध्ये रुळांवरून चालत पुढील स्थानक गाठावे लागले. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बोगद्यामध्ये मेट्रो बंद पडल्यानंतर डब्यातील बत्तीही गूल झाली. अचानक हा प्रकार घडल्याने प्रवासी गोंधळून गेले. व्हायरल व्हिडीओमध्ये प्रवासी डब्यात हँडरेल पकडून उभे असल्याचे दिसत आहे. जवळपास 10 मिनिटे नक्की काय झाले हेच प्रवाशांना समजत नव्हते. त्यानंतर मेट्रो अधिकाऱ्यांनी उद्घोषणा करत प्रवाशांना पायी चालत पुढील स्थानक गाठण्यास सांगितले.

मेट्रोतील प्रवासी बोगद्याच्या आत असलेल्या पादचारी मार्गावरून रांग लावून जवळपास 500 मीटर चालत हाय कोर्ट मेट्रो स्टेशनवर पोहोचले. या दरम्यान, बोगद्यातील आपत्कालीन दिवे, मोबाईलची बॅटरी आणि मेट्रो कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या तांत्रित समस्येमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, काही वेळेनंतर मेट्रो सेवा पूर्ववत झाल्याची माहिती चेन्नई मेट्रोने एक्सवर पोस्ट करत दिली. एअरपोर्ट ते विम्को नगर डेपोपर्यंत ब्लू लाईनवरील मेट्रो सेवा आता पूर्ववत झाली आहे. तसेच ग्रीन लाईनवरील सेंट्रेल मेट्रो ते सेंट थॉमस माउंटपर्यंतच्या सेवाही निर्धारित वेळनुसार सुरू असल्याचे चेन्नई मेट्रोने पोस्टमध्ये म्हटले. तसेच मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेदही व्यक्त केला.