
एलफिन्स्टन पूल पाडण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि एमआरआयडीसी (महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्यात बैठक सुरू आहे. मात्र अजूनही अंतिम कामाचा प्लॅन तयार झालेला नाही. एमआरआयडीसीने पूल पाडण्यासाठी 14 तासांच्या ब्लॉकची मागणी केली आहे, तर ओव्हरहेड वायरची कामे करण्यासाठी रेल्वेला जवळपास 1 तासाची गरज असेल. म्हणजे एकूण 15 तास दादर–सीएसएमटी सर्व्हिस बंद ठेवावी लागेल आणि याचा परिणाम 40 एक्सप्रेस व साधारण 1250 लोकल ट्रेनवर होऊ शकतो. त्यामुळे 15 तासांचा ब्लॉक कसा घ्यायचा हा प्रश्न मध्य रेल्वेसमोर निर्माण झाला आहे.
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ब्लॉकच्या काळात सीएसएमटी–दादर दरम्यानची सर्व चार मार्गिका बंद राहिल्यास 40 मेल/एक्सप्रेस आणि 1250 लोकल सर्व्हिसवर मोठा परिणाम होईल. देशभरातून येणाऱ्या अनेक गाड्या सीएसएमटीवर येतात; त्या दादर किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे थांबवायचा विचार झाला तरी त्या स्टेशनची क्षमता इतक्या गाड्या सामावून घेण्यासाठी पुरेशी नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांच्या शेड्यूललाही फटका बसू शकतो. सध्या हा ब्लॉक अशा पद्धतीने प्लान केला जात आहे की मुंबईकरांसह सर्व प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल. तसेच या ब्लॉकसाठी रेल्वे बोर्डाची परवानगी घेणेही आवश्यक आहे.
या पुलाचा 132 मीटरचा भाग मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या पट्ट्यातून जातो. मात्र दोन्ही विभागाचे काम स्वतंत्रपणे केले जाणार आहे. सुरुवात मध्य रेल्वेच्या बाजूने केली जाईल. पुलाच्या गर्डर आणि ओव्हरहेड वायर यांच्यातील अंतर खूपच कमी असल्याने कामाच्या काळात संपूर्ण मार्गाचा वीज पुरवठा बंद करावा लागणार आहे.



























































