
जम्मू-काश्मीरचे माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबैया हिच्या अपहरण प्रकरणात तब्बल 35 वर्षांनी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. शफत अहमद शांगलू असे त्याचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू होता. शफत याला शोधण्यासाठी 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. मात्र आता तब्बल 35 वर्षांनी शफत अहमद शांगलू यांना CBI कडून अटक करण्यात आली आहे.
शफत अहमद शांगलू कोण आहे?
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शफत अहमद JkLF साठी पदाधिकारी म्हणून काम करत होता. या अपहरणात यासीन मलिकचेही नाव समोर आले आहे. पाच दहशतवाद्यांची तुरुंगातून मुक्तता करणे हाच या अपहरणामागील हेतू होता.
डिसेंबर महिन्यात झाले होते अपहरण
1989 मध्ये डिसेंबरचा पहिला आठवड्यातच यासीन मलिक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रुबियाचे अपहरण करण्याचा कट रचला. रुबिया श्रीनगरमधील लाल देद रुग्णालयात इंटर्नशिपचे प्रशिक्षण घेत होती. मलिक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी विविध तुरुंगात कैद असलेल्या त्यांच्या पाच सहकाऱ्यांची सुटका करण्यासाठी रुबियाचे अपहरण केले.
सीबीआयच्या तपासानुसार, शफत यांनी गुलाम मोहम्मद नावाच्या व्यक्तीकडून निळी कार घेतली होती. ८ डिसेंबर 1989 रोजी ते दुसऱ्या आरोपी मुश्ताक अहमद लोनच्या घरी जमले आणि गृहमंत्र्यांची मुलगी श्रीनगरमधील नौगाम बायपासवर रुग्णालयातून घरी परतत असताना तिचे अपहरण केले.
सीबीआयने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त कारवाईत शफत अहमद शांगलूला श्रीनगरच्या निशात परिसरातील त्याच्या घरातून अटक केली. आता त्याला जम्मूतील टाडा न्यायालयात हजर केले जाईल. 1989 मध्ये रणबीर दंड संहिता आणि टाडा कायद्याच्या विविध कलमांखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.




























































