
एका फायनान्स कंपनीत प्रत्येक आठवडय़ाला भरण्याकरिता म्हणून 57 महिलांनी सलग आठ महिने दिलेले 6 लाख 62 हजार 550 रुपये कंपनीत न भरता स्वतःकडेच ठेवणाऱया चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार 1 जुलै 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत सांगलीतील आकाशवाणी केंद्रानजीकच्या सुभाषनगरमध्ये घडला आहे.
याप्रकरणी भारत फायनान्सियल इन्कल्युजन लिमिटेडचे शाखा व्यवस्थापक हर्षद अजित सुतार (रा. संपत चौक, माधवनगर रोड, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हर्षद सुतार हे भारत लिमिटेड कंपनीत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. कंपनीचे कार्यालय सुभाषनगर येथील माऊली बिल्डिंग येथे आहे. सदर कंपनीत संशयित मोनेश शांबकर बडीगर, मायकल बाळू माने (रा. शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), रवींद्र विठ्ठल पोवार (रा. कुची, जि. सांगली) आणि सुयोग सुरेश पाटील (रा. हेळगाव, ता. कराड, जि. सातारा) हे कामास आहेत. त्यांच्याकडे कंपनीत गुंतवणूक करणाऱया महिलांकडून आठवडय़ाला हप्ता जमा करण्याचे काम आहे.
चौघाही संशयितांनी संगनमत करून आठ महिने 57 महिलांकडून आठवडय़ाला कंपनीत जमा करण्यासाठी पैसे घेतले. मात्र, ते कंपनी कार्यालयात जमा न करता स्वतःकडेच ठेवले. ही रक्कम 6 लाख 62 हजार 550 रुपये इतकी आहे. ही बाब लक्षात आल्यावर चौघाही संशयितांविरोधात फिर्याद दिल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.






























































