
मुलांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण चिंतेचा विषय बनत चालले आहे. आता लखनौच्या मोंटफोर्ट इंटर कॉलेजमध्ये एका अकरा वर्षीय मुलाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला आहे. परिक्षेचा पेपर लिहीत असताना तो खुर्चीवरुन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
आरव सिंह असे विद्यार्थ्याचे नाव आहे. लखनौच्या मोंटफोर्ट इंटर नॅशनल कॉलेजमध्ये शुक्रवारी सकाळी 10.45 वाजता ही घटना घडली आहे. सहावीची परिक्षा सुरु होती. आरव आपल्या जागेवर बसून पेपर लिहीत होता. अचानक तो खुर्चीवरुन खाली कोसळला. त्याचे मित्र आणि शिक्षकांनी त्याला लगेच उचलले मात्र त्याचा श्वास थांबला होता. शाळा प्रशासनाने तत्काळ अॅम्ब्युलन्स मागवली आणि त्याला जवळच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले.
बीआरडी रुग्णालयाचे मुख्य चिकित्सा अधीक्षक डॉ.पंजीत दिक्षित म्हणाले की, 11 वाजून 5 मिनीटांनी मोंटफोर्ट शाळेतून बेशुद्धावस्थेत आरव सिंह याला आणले होते. तत्काळ त्याला सीपीआर आणि अन्य योग्य उपचार सुरु केले. मात्र काहीच फरक पडला नाही. अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासात त्याला कार्डियक अरेस्ट आल्याचे सांगितले. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल.
























































