मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण – पोलिसांकडून तेजवानीच्या घरांची झाडाझडती

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अटक असलेल्या शीतल तेजवानी हिच्या कोरेगाव पार्क आणि पिंपरी चिंचवडमधील घरांची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी झाडाझडती घेतली. सुमारे तीन तास सर्च मोहीम राबवून पोलिसांनी जमीन घोटाळा संदर्भातील काही महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत.

मुंढवा परिसरात असलेल्या 40 एकर जमिनीची आरोपी शीतल तेजवाणी हिने 275 जणांना आमिष दाखवून ‘पॉवर ऑफ अॅटर्नी’ घेतली होती. त्यानंतर ती जमीन 2025 मध्ये अमेडिया पंपनीशी करार करून त्यांना हस्तांतरित केली.

प्रकरणात अमेडिया पंपनीचे भागीदार पार्थ पवार, दिग्विजय पाटील, तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे यांचे जबाब आधीच नोंदविले आहेत. तर, गुरुवारी तेजवानीला पोलिसांनी अटक केली. तिला न्यायालयाने 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेजवानीला सोबत घेऊन तिच्या कोरेगाव पार्क येथील आणि पिंपरी चिंचवड येथील दोन्ही घरांची झाडाझडती घेतली.

पिंपरीतील माहेरच्या घरीही तपास

आरोपी शीतल तेजवानी हिच्या पिंपरी चिंचवड येथील माहेरच्या घरी पुणे पोलीस पोहोचले होते. पोलिसांनी घराची तपासणी केली. शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. मात्र तिचे माहेर हे पिंपरीतील वैष्णोदेवी मंदिराजवळ आहे. माहेरच्या घरात काही पुरावे दडवून ठेवले असतील, अशी शंका पोलिसांना होती.

पार्थ पवार यांची चौकशी कधी?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या अमेडिया पंपनीने मुंढव्यातील 40 एकर जमीन अनियमितपणे खरेदी केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीचा दोन वेळा जबाब नोंदवला होता. जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला गुरुवारी अटक केली. दरम्यान, पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिग्विजय पाटील याला नोटीस बजावून 1 डिसेंबरला त्याचा जबाब घेतला. आता यातील मुख्य संचालक असलेले पार्थ पवार यांचा जबाब कधी नोंदवला जाणार, त्यांच्याकडे चौकशी कधी केली जाणार, पोलीस त्यांना चौकशीला कधी बोलावणार याबाबत चर्चा सुरू आहेत.