तपोवनातील वृक्षतोडीवर सरकार ठाम; कुंभमेळा मंत्री महाजन म्हणतात, चारशेच्या बदल्यात पंधरा हजार झाडे लावणार हा केवढा मोठा विषय

‘वाईटात वाईट झाले तर चारशेपैकी तीनशे झाडे समजा वाया जातील. पण, त्याबदल्यात पंधरा हजार झाडं लावतो आहोत, हा केवढा मोठा विषय आहे. थोडी शासनाची भूमिकाही समजून घ्या असे सांगून मंत्री गिरीष महाजन यांनी तपोवनातील वृक्षतोडीवर सरकार ठाम असल्याचे स्पष्ट केले.

तपोवनातील वृक्षतोडीच्या बदल्यात गंगापूर, मखमलाबाद, चुंचाळेसह शहरात ठिकठिकाणी पंधरा हजार झाडे लावण्यात येणार आहेत. शुक्रवारी कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन यांनी येथे पाहणी केली, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आज शिंदे गटाने आंदोलन केले, त्यावर मी काही बोलणार नाही. त्यांना एकदम आठवण का झाली हे माहित नाही, असे सांगून ते म्हणाले, ‘ठिक आहे, तेही नाशिककर आहेत, त्यांची भावना मी समजू शकतो’, असा टोला त्यांनी शिंदे गटाला हाणला.

एक्झिबिशन सेंटर रद्द होणार?

तपोवनातील झाडे तोडून येथे कुठलंही कमर्शिअल काम होणार नाही, कोणाच्याही घशामध्ये ही जागा जाणार नाही. येथील उद्योजकांची संघटना ‘निमा’ने ही जागा मागितली होती. कुंभमेळा काळात ही जागा साधूंना राहण्यासाठी होईल, त्यानंतर एक्झिबिशनसाठी तिचा सर्वांना उपयोग होईल, असा निमाचा प्रस्ताव होता. पण, आता आम्ही तेही रद्द करण्याच्या मानसिकतेत आहोत, एकही झाड तोडून तिथे एक्झिबिशन सेंटर उभारले जाणार नाही. रिकामी जागा असेल तिथे एक्झिबिशन सेंटर करण्याचा विचार आम्ही नंतर करू. पण, तपोवनात असे कमर्शिअल काम होणार नाही, असे महाजन म्हणाले.