
राज्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्था वगळता उर्वरित सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यापूर्वी पाऊस आणि अतिवृष्टीच्या संकटामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल.
नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच पार पडला आहे. या निवडणुकीचा दुसरा टप्पा येत्या 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. याशिवाय मुंबईसह राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या तयारीत संबंधित प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा पूर्णपणे गुंतलेली आहे. परिणामी सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ, पोलीस बंदोबस्त देण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

























































