कोल्हापूरची हवा बनली रोगट; आजारांना आमंत्रण, हवा खराब, निर्देशांक 150 वर

>>शीतल धनवडे

निसर्गसंपन्नता लाभलेल्या कोल्हापूरला आता पाण्याबरोबरच हवेच्या प्रदुषणाचे ग्रहण लागले आहे. 0 ते 50 चांगली, 50 ते 100 बरी, 100 ते 150 खराब, तर 150 ते 200 रोगट (अनहेल्दी), 200 ते 300 गंभीर आणि 300 पासून धोकादायक असे हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकात (एअर क्वालिटी इंडेक्स) कोल्हापूरने 150ची पातळी ओलांडली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून येथील हवेचा निर्देशांक 165 पर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. दमा, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हवा गंभीर मानली जात आहे. भविष्यातील ही धोक्याची घंटा ओळखून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

भौगोलिक रचना, निसर्ग संपन्नता, स्वच्छ हवामानामुळे राहण्यासाठी आकर्षणाचे केंद्र म्हणून कोल्हापूरला सर्वांची सर्वाधिक पसंती असायची; पण वाढत्या हवा प्रदूषणामुळे कोल्हापूरच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत असल्याचे वास्तव चित्र आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार कोल्हापूरचा एअर क्वालिटी इंडेक्स 160च्या वर जाऊन ‘मध्यम ते खराब’ श्रेणीत पोहोचला आहे. कोल्हापूर शहर आणि जिह्यात हवेतील सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण गेल्या काही दिवसांत झपाटय़ाने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या निर्देशांकामुळे दमा, हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हवा गंभीर मानली जाते.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दि. 22 ते 29 नोव्हेंबरच्या बुलेटिननुसार कोल्हापूरच्या हवेचा निर्देशांक 104, 105, 106, 129, 153 आणि 164 राहिला आहे. तर गेल्या काही दिवसांत 186 इतका नोंदविला गेला असून, सर्वच दिवशी ठीक ते खराब (मॉडरेट टू पूअर) श्रेणीत मोडतो. या सूचकांकात पीएम 10 आणि पीएम 2.5 हे दोन्ही सूक्ष्म धुलीकण प्रमुख प्रदूषक म्हणून नोंदविले गेले आहेत. म्हणजेच धुळीचे प्रमाण राष्ट्रीय मानकांच्या जवळपास दुपटीपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या कणांचे सुरक्षित प्रमाण याहूनही खूप कमी असावे, अशी शिफारस आहे. मात्र, प्रत्यक्ष स्थिती त्यापेक्षा अनेक पट जास्त आहे. कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था, वृक्षांचे कमी होणारे प्रमाण आणि जंगल, शेती यांना लावत असलेल्या आगींमुळे कोल्हापूरच्या हवेचा दर्जा घसरल्याचे शिवाजी विद्यापीठातील पर्यावरण विभागाचे प्रा. चेतन भोसले यांनी सांगितले.

निर्देशांक वाढल्याने आरोग्यावर परिणाम

n पीएम 2.5 म्हणजे 2.5 मायक्रॉनपेक्षा लहान वायू प्रदूषणाचे कण, जे फुफ्फुस आणि रक्त प्रवाहात प्रवेश करू शकतात. ज्यामुळे श्वसनाच्या समस्या, हृदयरोग आणि अगदी कर्करोगदेखील होऊ शकतात. वाहनांचे धुराचे उत्सर्जन, औद्योगिक उत्सर्जन आणि लाकूड वा पिकांचा कचरा जाळणे हे स्त्र्ााsत आहेत. राष्ट्रीय आरोग्य संस्थांच्या सल्ल्याप्रमाणे पीएम 2.5 आणि पीएम 10 कण फुफ्फुसांच्या आत खोलवर जाऊन सूज, दाह निर्माण करतात व वायुमार्ग अरुंद करतात. परिणामी सीओपीडी वा श्वसनविकार असलेल्या रुग्णांमध्ये श्वास घ्यायला त्रास, सतत खोकला, शिटीवजा आवाज अशी लक्षणे तीव्र होऊ शकतात. हेच कण रक्त प्रवाहात मिसळल्यास लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना सर्दी, डोळ्यांत जळजळ, नाक चुरचुरणे, थकवा, ऍलर्जी अशा तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी सांगितले. महाराष्ट्रातील हवा गुणवत्ता स्थिती अहवालानुसार कोल्हापूर अद्यापि राष्ट्रीय मानक पूर्ण न करणाऱया ‘नॉन अटेनमेंट सिटी’ मध्येच राहत आहे. म्हणजेच मोठय़ा खर्चानंतरही दीर्घकालीन प्रदूषणात अपेक्षित घट दिसून आलेली नाही.

n शहरातील ताराबाई पार्क या उच्चभ्रू वसाहतीत सिंचन भवन चौकात तापमान आणि हवेची दैनंदिन माहिती दर्शविणारा मोठा इलेक्ट्रॉनिक फलक बसविण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून हा फलक बंद अवस्थेत आहे.