गायमुख ते फाऊंटनदरम्यान मास्टिक अस्फाल्टचे काम, घोडबंदर रोड उद्या वाहतुकीसाठी बंद

घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाऊंटनदरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रविवार 7 डिसेंबर रोजी ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम करण्यात येणार आहे. त्याकरिता घोडबंदर रोड अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी तुकासाठी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवार मध्यरात्री 12 ते रविवार मध्यरात्री 12 या कालावधीत संपूर्ण रस्ता बंद राहणार आहे. यावेळी प्रवाशांची वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

मेट्रोची कामे, अरुंद-नादुरुस्ती रस्त्यांमुळे व अवजड वाहनांची वाहतूक यामुळे घोडबंदर प्रवास जीवघेणा आणि त्रासदायक झाला असून प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. अर्ध्या तासाचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना तासन्तास वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो, तर नादुरुस्त रस्त्यामुळे अपघात होऊन अनेकांचे बळीदेखील गेले आहेत. मात्र अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम आता शेवटच्या टप्प्यात आले असून रस्त्याचे ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम रविवारी पूर्ण करण्यात येणार आहे. त्या कामासाठी 24 तासांचा बंद ठेवण्यात आला आहे.

असा असेल पर्यायी मार्ग

मुंबई, ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना वाय जंक्शन कापूरबावडी येथे प्रवेश बंद.
मुंब्रा, कळवा येथून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद.
नाशिककडून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना माणकोली नाका येथे प्रवेश बंद.
मुंबई, ठाणे, मुंब्रा, कळवा, नाशिक येथून येणारी सर्व अवजड वाहने भिवंडीतील माणकोली-अंजूरफाटामार्गे इच्छितस्थळी जातील.

हलक्या वाहनांना दिलासा

ठाणे येथून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांना गायमुख चौकीपासून फाऊंटन हॉटेलपर्यंत विरुद्ध दिशेने प्रवास करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हलक्या वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र त्यांना काही काळ वाहतूककोंडीचा सामना करावा लागेल. या अधिसूचना पोलीस वाहने, फायरब्रिगेड, रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना लागू राहणार नसल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.