
ऊन, वारा, पाऊस आदींची तमा न बाळगता सर्वसामान्यांच्या मदतीसाठी अग्निशमन विभाग हा 24 तास तत्पर असतो. कधी आग लागल्याची तक्रार तर कधी घरात कोणी अडकलेय यासाठी फोन खणखणतो तेव्हा लगबगीने या विभागाचे जवान घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करतात. या विभागाने केवळ माणसांच्या तक्रारी नव्हे तर पशुपक्ष्यांवरदेखील दया केली आहे. गेल्या 11 महिन्यात कल्याण-डोंबिवली शहरातील 146 पशुपक्ष्यांना जीवदान दिले असून त्यात गाई, कुत्रे, मांजरी तसेच कबुतरे, कावळ्यांचा समावेश आहे.
अग्निशमन दलाचा दूरध्वनी हा पावसाळा असो वा नसो, वर्षाचे 12 महिने खणखणत असतो. अहो साहेब… येथे आग लागली आहे. पतंगाच्या मांज्यात कावळे, कबुतरे अडकले आहे. तसेच नाल्यात कुत्रा अडकून पडला आहे, असे फोन दररोज चालूच असतात. एखाद्या ठिकाणी कबुतर किंवा कुत्रा जखमी असल्याचे समजताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने धाव घेऊन प्राणी किंवा पक्ष्यांचे जीव वाचवतात. एवढेच नव्हे तर जखमी पक्ष्यांना तसेच प्राण्यांवर उपचार करून सोडून देतात. कर्मचाऱ्यांच्या या तत्परतेबद्दल प्राणी व पशुप्रेमींनी कौतुक केले आहे. अशाप्रकारे जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंत तब्बल 146 पशुपक्ष्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी नवआयुष्य दिले आहे.
नागरिकांप्रमाणे पशुपक्षीही आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही तक्रार आली तरी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी जाऊन सर्वतोपरी प्रयत्न करतात. अनेकदा तर जवानांना स्वतःच्या जीवाची बाजी लावून काम करावे लागते. प्रत्येकाचा जीव वाचायला हवा हाच या मागचा उद्देश आहे.
विनायक लोखंडे, अग्निशमन केंद्र अधिकारी, कल्याण
आकडेवारी
जानेवारी-फेब्रुवारी-33, मार्च 13, एप्रिल – 16, मे 12, जून-16, जुलै-17, ऑगस्ट-11, सप्टेंबर-6, ऑक्टोबर-10, नोव्हेंबर-12.



























































