
मतदार याद्यांमधील घोळावरून सर्वत्र टीकेची झोड उठली असतानाच ठाणे महापालिका क्षेत्रात तब्बल 83 हजार 644 नावे दुबार आढळून आली आहेत. तशी कबुलीच महापालिकेने दिली आहे. ही नावे ‘संभाव्य’ असल्याचा दावा करण्यात आला असला तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा गोंधळात गोंधळ निर्माण झाला आहे. दुबार नावांची यादी महापालिकेने आज वेबसाइटवर जाहीर केली आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली. त्यानंतर सदोष मतदार यादीतील अनेक ‘झोल’ उघडकीस आले होते. निवडणूक आयोगाच्या बेफिकीर कारभारावर रोज टीका होऊ लागली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी दुबार नावावरून निवडणूक आयोग आणि महापालिकेच्या कारभाराविषयी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले होते. तसेच या प्रारूप मतदार यादीतील घोळावरून मनसेनेदेखील आंदोलन करीत महापालिकेवर टीकेची झोड उठवली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी सदोष मतदार याद्यांवर आक्षेप घेत पालिका आयुक्त सौरभ राव यांना पुरावे दिले होते.
ठाणे महानगरपालिका नावे हटवण्याचे प्रशासनासमोर आव्हान
2017 पालिका निवडणुकीमध्ये 12 लाख 28 हजार 606 इतकी मतदारांची संख्या होती. यावर्षी मतदारांची संख्या 4 लाख 21 हजार इतकी वाढली आहे. त्यात आता 83 हजार दुबार नावे आहेत. ही दुबार नावे हटवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
बुधवारी अंतिम यादी प्रसिद्ध होणार
प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर हरकती, सूचना दाखल करण्यात आल्या. प्रत्येक प्रभागात सरासरी एक हजार दुबार मतदार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, येत्या बुधवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मीरा-भाईंदरमध्येही 44 हजार नावे
मीरा-भाईंदर जवळपास 740 हरकती, सूचना नोंदवण्यात आल्या होत्या. त्यानुसार शहरात 44 हजार 862 दुबार नावे असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. या नावांची पडताळणी करण्याचे काम महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, या नावावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




























































