कोकणच्या हापूसवर गुजरातचे अतिक्रमण! ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज; रोहित पवारांनी वेधले लक्ष

अस्सल ‘कोकण हापूस’ आंब्यावर आता भौगोलिक मानांकनावरून मोठे संकट उभे राहिले आहे.  गुजरातने या आंब्यावर दावा करत ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लक्ष वेधले आहे. सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि कोकणातील आंबा उत्पादकांचं संरक्षण करावं, तसंच कोकणातील सत्ताधारी नेत्यांनीही हा प्रश्न लावून धरावा, ही विनंती त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत केली आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोकण शब्द उच्चारताच नकळत पुढं हापूस शब्द निघतो… कोकण हापूसला संपूर्ण जगातून मागणी आहे आणि येथील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने हापूसला जपलंय. हापूस म्हणजे येथील शेतकऱ्यांचं जगण्याचं साधन आहे. कोकणातील सर्वाधिक मोठी उलाढाल ही हापूसच्या माध्यमातून होते, पण गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने 2023 मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी अर्ज केल्याने कोकण हापूसवर आता मानांकनाचं संकट घोंगावतंय. सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि कोकणातील आंबा उत्पादकांचं संरक्षण करावं, तसंच कोकणातील सत्ताधारी नेत्यांनीही हा प्रश्न लावून धरावा, ही विनंती! अशी पोस्ट शेअर केली आहे. सोबत त्यांनी आंब्याचे फोटोही शेअर केले आहेत.