स्वस्त तिकीट दर, नो कॅन्सलेशन फी…., Indigo चा गोंधळ पण Air India प्रवाशांना मदतीचा हात

देशभरात विमान फेऱ्यांच्या वेळापत्रकात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) या विमान कंपन्यांनी शनिवारी प्रवाशांना दिलासा देणारे अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. जादा पैसे देऊन किंवा अडचणी सहन करून कोणालाही प्रवास करावा लागू नये यासाठी तिकीट दर नियंत्रणापासून ते तिकीट रद्दीकरणावरील शुल्क माफ करण्यापर्यंत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत.

एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 4 डिसेंबरपासून दोन्ही एअरलाइन्सनी देशांतर्गत विमानांच्या इकॉनॉमी तिकिटांचे दर निश्चित केले आहेत. सध्या उड्डाण विमानांच्या वेळापत्रकात बदल होत आहेत. त्यामुळे तिकिटांच्या दरात अचानक खूप वाढ होत असताना एअर इंडियाने मोठे निर्णय घेतले. ज्यांनी 4 डिसेंबरपर्यंत तिकीट बुक केले आहे आणि ज्यांचा प्रवास 15 डिसेंबरपर्यंत नियोजित आहे , ते प्रवासी 8 डिसेंबरपर्यंत एकदाच कोणतेही शुल्क न भरता आपल्या प्रवासाची तारीख बदलू शकतात. तसेच, तिकीट रद्द केल्यास कोणतेही रद्दीकरण शुल्क लागणार नाही आणि पूर्ण परतावा दिला जाईल . मात्र, नवीन तारखेच्या तिकिटात भाड्याचा फरक असल्यास तो प्रवाशाला भरावा लागेल.

प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी, दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या ग्राहक संपर्क केंद्रांमध्ये अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. एअर इंडिया एक्सप्रेसचे ग्राहक व्हॉट्सॲप चॅटबॉट “TIA”, वेबसाइट आणि ॲप द्वारे देखील बदल करू शकतात. जर एखाद्या विमानामध्ये जागा रिकामी असतील, तर इकॉनॉमी क्लासमधील प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता वरच्या क्लासमध्ये (Upgraded) बसवले जाऊ शकते . गर्दी कमी करण्यासाठी काही मार्गांवर अतिरिक्त विमाने देखील चालवली जात आहेत.

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि लष्करी जवान व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारे विशेष लाभ (Special Concessions) यापुढेही सुरू राहतील. ग्राहक कंपनीच्या वेबसाइट किंवा ॲपवर या विशेष दरांवर तिकीट बुक करू शकतात. सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रवाशांवरील आर्थिक ताण कमी करणे आणि जास्तीत जास्त लोकांना लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.