
आधुनिक तंत्रज्ञानाचा अविभाज्य भाग बनलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर सर्व क्षेत्रात केला जातोय. आश्चर्याची बाब म्हणजे एआयचा वापर आता रुग्णाचा जीव वाचवण्यासाठीही होताना दिसत आहे. ही घटना एलॉन मस्क यांच्या xAI कंपनीच्या Grok चॅटबॉट शी संबंधित आहे. रेडिट या सोशल मीडिया अॅपवर एका व्यक्तीने आपला अनुभव शेअर केला आहे.
सोशल मीडिया अॅप रेडिजवर दिलेल्या पोस्टनुसार, AI ने एका व्यक्तीला वेळीच गंभीर आजाराबद्दल सावध केले आणि त्याचा जीव वाचवला. सुरुवातीला, जेव्हा या व्यक्तीने डॉक्टरांचा सल्ला घेतला, तेव्हा डॉक्टरांनी त्याला ‘गॅसमुळे होणाऱ्या वेदना’ समजून सामान्य औषधे देऊन घरी पाठवले. मात्र औषधे घेऊनही वेदना कमी न झाल्याने, त्याने आपली संपूर्ण समस्या Grok AI चॅटबॉटला सांगितली.
Grok AI ने दिलेल्या उत्तराने तो थक्क झाला. चॅटबॉटने त्याला सांगितले की, “हा काही सामान्य त्रास नाही. ॲपेंडिक्समध्ये छिद्र पडण्याची शक्यता आहे. तुम्ही तातडीने हॉस्पिटलमध्ये जा आणि सीटी स्कॅन करा. तेव्हाच तुम्हाला असणाऱ्या आजाराचे निदान होईल, असे स्पष्ट उत्तर ग्रोकने दिले.
Grok च्या सल्ल्यानंतर, त्या व्यक्तीने तातडीने रुग्णालयात गेला. आणि वाढत्या वेदनांची तक्रार करत डॉक्टरला सीटी स्कॅन करण्यास सांगितले. सीटी स्कॅन केल्यानंतर रिपोर्टमधून Grok AI ने वर्तवलेली भीती खरी ठरली. त्याचे ॲपेंडिक्स सुजले होते आणि ते फुटण्याच्या स्थिती निर्माण झाली होती. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून ॲपेंडिक्स काढून टाकले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.

























































