
दहावीतल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना परीक्षेत घवघवीत यश मिळावे यासाठी शिवसेना दिंडोशी विधानसभा क्षेत्राच्या वतीने गोरेगाव पूर्व, दिंडोशी, मालाड विभागातील सर्व माध्यमांच्या 40 हून जास्त शाळांमधील 3500 विद्यार्थ्यांना मोफत प्रश्नसंचाचे वाटप करण्यात येत आहे.
गुणवत्ता असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण संपादन करता येत नाही. हे लक्षात घेऊन शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या संकल्पनेतून आणि माजी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर यांच्या पुढाकारातून दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञांनी तयार केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रश्नसंचाचे अनावरण शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऍड. सुहास वाडकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू, विधानसभा संघटक प्रशांत कदम, उपविभागप्रमुख सुनील गुजर, प्रदीप निकम, विधानसभा संघटक रिना सुर्वे, पूजा चौहान, रुचिता आरोसकर, गणपत वारीसे, सुधाकर देसाई, स्नेहा गोलतकर, जयश्री चौहान आदी पदाधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आणि गोरेगाव पूर्व भागातील पदाधिकारी-कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
प्रत्येक विषयाच्या सात प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. हे प्रश्नसंच मराठी, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थांसाठी आहेत. यात मराठी, हिंदी, इंग्रजी, बीजगणित, भूमिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान पेपर-1 आणि 2, इतिहास-राज्यशास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, इंग्लिश रीडर अशा विषयांच्या प्रश्नपत्रिका आहेत.




























































