मायक्रोसॉफ्ट हिंदुस्थानात AI हब बांधण्यासाठी १७.५ अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक, सत्या नाडेला यांची घोषणा

मायक्रोसॉफ्ट हिंदुस्थानात एआय हब बांधण्यासाठी १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार, अशी घोषणा मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी केली आहे. मंगळवारी सत्या नाडेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मायक्रोसॉफ्ट हिंदुस्थानात १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणार आश्वासन सत्या नाडेला यांनी दिलं, असं वृत्त ‘एबीपी न्यूज’ने दिलं आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी घोषणा केली आहे की, ते हिंदुस्थानात एआय विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्ये तयार करण्यासाठी १७.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करतील. ही त्यांच्या कंपनीची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

दरम्यान, सत्या नडेला हे सध्या मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत. त्यांनी २०१४ साली स्टीव्ह बाल्मर यांच्या निवृत्तीनंतर मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर २०२१ मध्ये जॉन डब्ल्यू. थॉम्पसन यांच्या जागी ते मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बनले. यापूर्वी ते मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड आणि एंटरप्राइझ गटाचे कार्यकारी उपाध्यक्ष होते.