
कुंपणानेच शेत खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार रायगड पोलीस दलात उघड झाला आहे. बोगस पोलीस पाटील यांची नावे मानधन बिलात घुसवून जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचा घपला केला आहे. या गैरव्यवहारप्रकरणी पोलीस लेखा शाखा विभागातील राजेश जाधव या कनिष्ठ लिपिकासह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दलातील अपहार उघड होताच रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखा विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या राजेश जाधव याने २०२१ पासून जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची यादी बनवून त्यामध्ये प्रत्यक्ष हजर नसलेल्या पोलीस पाटलांची बनावट नावे टाकून मानधन देयके तयार केली. यानंतर दरमहा कोषागारातून मंजुरी प्राप्त करून घेतली. त्यानंतर पुन्हा या यादीमध्ये फेरफार करून दुसरी बनावट यादी तयार करून स्वतःच्या नावे ७२ लाख ३२ हजार ५०० रुपये तर रिया जाधव या पोलीस पाटील नसताना त्यांच्या नावाचा मुदतवाढीचा खोटा दाखला बनवून त्यांच्या नावाने १ कोटी ५ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम कोषागारातून काढत गैरव्यवहार केला. तसेच हा गैरव्यवहार करताना काही पोलीस पाटील यांची नावे दुबारपेक्षा अधिक वेळा दाखवून त्यांच्या खात्यावर मानधनाची रक्कम टाकण्यात आली आहे. याप्रकरणी राजेश जाधव, रिया जाधव व इतर दोन अशा एकूण चौघांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणत्याही क्षणी दोषींना अटक केली जाऊ शकते.
ही रिया जाधव कोण?
राजेश जाधव याने चार वर्षांत कोट्यवधीचा भ्रष्टाचार करूनही तो नामानिराळा होता. जिल्हा पोलीस दल आणि कोषागारातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून त्याने गैरव्यवहार केला आहे का? याचा आता तपास सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे रिया राजेश जाधव या नावे एक कोटीपेक्षा जास्त रकमेचे बिल काढले. राजेश जाधव याच्या कुटुंबातील ही रिया आहे की बनावट नाव वापरून राजेश याने रक्कम हडप केली याचाही तपास सुरू आहे





























































