
मुंबई उच्च न्यायालयासमोर एका इसमाने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. प्रकाश सावंत असे जाळून घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. घटनेत सावंत 50 ते 60 टक्के भाजल्याची माहिती मिळते. सावंत यांना उपचारासाठी जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रकाश सावंत हे कणकवलीतील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे प्रकल्पग्रस्त आहेत. सावंत यांचा वकिलासोबत पैशावरून वाद झाला. याच वादातून सावंत यांनी उच्च न्यायालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले. सावंत यांना तात्काळ जीटी रुग्णालयात नेण्यात आले.
























































