
चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे गावाजवळील घरणी नदीजवळ विसर्जन तलावात संगाप्पा महाराज पुलाजवळ दोन मृतदेह सापडले. मृतदेह एक पुरुष आणि एका महिलेचे असून गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नळेगाव येथे पाठवले आहे. चाकूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नळेगाव ते सावंतवाडीकडे जाणाऱ्या रोडवर घरणी नदीच्या पात्रालगत विसर्जन तलावात दोन मृतदेह सोमवारी मृतदेह आढळून आले. अनिता लक्ष्मण तेलंगे (35) ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार 11 डिसेंबर रोजी चाकूर पोलिसात नोंद करण्यात आली होती. मात्र शोध घेऊनही ती कुठेही आढळून आली नाही. तसेच राजकुमार हणमंत शृंगारे (40) हेही मागच्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. पण त्याची तक्रार पोलिसांत दिली नव्हती. या दोघांचेही मृतदेह सोमवारी दुपारी येथील विसर्जन तलावात तरंगताना आढळून आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. एल. नीलकंठे पोलीस हेड कॉन्स्टेबल सिद्धेश्वर जाधव, शत्रुघ्न शिंदे, शिरीष नागरगोजे, योगेश मरपल्ले हे करीत आहेत.





























































