
पालिकेच्या घाटकोपर पश्चिम येथील राजावाडी रुग्णालयातील रक्त विघटन मशीन मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांच्या उपचारांना विलंब होत असून अनेक रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत माजी पालकमंत्री नसीम खान यांनी राजावाडी रुग्णालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले.
राजावाडीचे ब्लड डिसॉव्हिंग मशीन बंद असल्याने बाहेरून ही सेवा घ्यावी लागत असल्याने तीन ते चार हजार रुपयांचा नाहक भुर्दंड पडत आहे. शिवाय नातेवाईकांना डॉक्टर बाहेरून औषधे खरेदी करायला सांगत असल्याने गोरगरीब रुग्णांना आर्थिक फटका बसत आहे. याबाबतच्या तक्रारीसंदर्भात राजावाडी रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. भारती राजुवाला यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ईशान्य मुंबईमधील हे एकमेव ब्लड प्रोसेसिंग सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी अधिक्षिका डॉ. भारती राजुवाला यांनी आठ दिवसांत मशीन पूर्ववत होईल असे आश्वासन दिले. या वेळी कॉँग्रेसचे प्रभाकर जावकर, रामगोविंद यादव, समीर अख्तर, कमलेश कपाशी, मनीषा सूर्यवंशी, खलील खोत, गजानन भालेकर यांच्यासह रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.






























































