
पालघर तालुक्यातील नवापूर ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राजेश संखे याला वीस हजारांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले. ग्रामपंचायतीमधील एका कृषी पर्यटन केंद्राला ना हरकत दाखला देण्यासाठी संखे याने पैशांची मागणी केली होती. ती लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुपत प्रतिबंधक विभागाने संखे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नवापूर गावामध्ये एक कृषी पर्यटन केंद्र असून कृषी पर्यटन केंद्राच्या मालकाने तरंग तलाव, कृषी पर्यटन त्यामध्ये पर्यटकांसाठी तीन खोल्या, उपाहारगृह व न्याहारी गृह सुरू करण्यासाठी नवापूर ग्रामपंचायतीकडे ना हरकत दाखला मिळण्याकरिता विनंती अर्ज केला होता. मात्र ग्रामपंचायत अधिकारी तथा ग्रामसेवक राजेश संखे यांनी ना हरकत न देता तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.




























































